खाकुर्डी येथे दि.1 रोजी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण
मालेगाव:- तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथे शिवस्मारक समितीच्या वतीने पूर्वीच्या जीर्ण झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या च्या जागेवर नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन व स्वागत आज मालेगाव नगरीत करण्यात आले.
मालेगाव महामार्ग टेहरे फाटा येथे नाशिक येथून महाराजांच्या पुतळ्याचे आकर्षकरित्या सजविलेल्या वाहनात आगमन झाल्यानंतर खाकुर्डी शिव स्मारक समिती व शिवप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी मालेगाव शिवसेनेच्या वतीने मनपा उपमहापौर निलेश आहेर,अजिंक्य भुसे,संजय दुसाने,मनोहर बच्छाव, प्रमोद शुक्ला यांनी शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
नाशिक येथील मूर्तिकार आनंद सोनवणे यांनी एकप्रकारचा हलका वजनाचा धातू वापरून महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा बनविला असल्याची माहिती शिव स्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे यांनी दिली.
या वेळी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची टेहरे फाटा महामार्ग येथून मालेगाव शहरातील गिरणा पूल, मोतीबाग नाका,मौसम पूल, एकात्मता चौक,मसगा कॉलेज चौक, रावळगाव नाका, चर्च गेट मार्गे नामपूर रोड, निलगव्हान फाटा ,अजंग , सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या मार्गावर जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी शिवस्मारक समितीचे सदस्य व पंचक्रोशीतील शिवप्रेमी तरुण, महिला नागरिक यांनी ठिकठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत करून वंदन केले.
मिरवणुकीत सरपंच जयराज ठाकरे यांच्या सह समितीचे देवेंद्र ठाकरे, निलेश ठाकरे, संदिप ठाकरे, भुषण ठाकरे, प्रणव ठाकरे, राजेंद्र ठाकरे, नितीन ठाकरे , किशोर ठाकरे आदींसह विराने, पोहाने, चिंचवे, गारेगाव, कजवाडे, लुल्ले, नागझिरी, वडनेर, खाकुर्डी या भागातील शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी जाणता राजाचे भगवे ध्वज लावून मोटर सायकल रॅली काढण्यात आली.
तसेच दिनांक १ नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा छगन भुजबळ व कृषिमंत्री मा दादाजी भुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते व्याख्याते नितीन बानगुडे पाटील व शिवशाहीर विजय तनपुरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ राहणार असून दिनांक 30,31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर या दिवशी छत्रपतींच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात येणार असून दिनांक 1 रोजी भव्यदिव्य शिवशाही थाटात जल्लोषात मिरवणूक काढण्यात येवून पूर्वीच्या चौकाचे सुशोभीकरण करून महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयोजनकांनी दिली.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں