मालेगाव शहरातील विकास कामांना
निधी कमी पडू देणार नाही
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
*मालेगाव, दि. 15 (उमाका वृत्तसेवा)*: शहरातील चांगल्या रस्त्यांमुळे विकास कामांना गती मिळत असते, जुना आग्रारोड च्या नुतणीकरणातून विकासाबरोबरच शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा विश्वास राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज व्यक्त करत मालेगाव शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी आज दिली.
शहरातील जुना आग्रा रोडच्या नुतणीकरणाचे भुमीपूजन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज पार पडले, याप्रसंगी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख रशीद, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव, माजी आमदार रशीद शेख, माजी आमदार आसिफ शेख, नगरसेवक मदन गायकवाड, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 13 कोटीच्या या रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनीधींसह नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामासाठी शासन सदैव प्रयत्नशील असून शासनामार्फत रस्ते विकासाबरोबरच इतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. गत वर्षी मालेगावमध्ये आलेल्या कोरोनाच्या संकटाला ज्या पध्दतीने परतावून लावले त्याच पध्दतीने आता यापुढे देखील नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. त्याच बरोबर नागरिकांना समुपदेशन करून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे आवाहनही त्यांनी लोकप्रतिनीधींसह महानगरपालिका प्रशासनास केले.
शहराच्या विकासकामांसाठी महानगरपालिका कटिबध्द असल्याचे सांगतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार रशीद शेख म्हणाले, आज भुमीपूजन झालेल्या जुन्या आग्रारोडवरील अतिक्रमीत धारकांनी स्वत:हून पुढाकार घेत अतिक्रमण काढून घ्यावे. शहरातील जुना आग्रा रोडचे दुभाजकासह कॉक्रीटीकरण करण्यासोबतच आरसीसी नाला करण्यात येणार असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याचा निचराही सहजपणे होईल, असा विश्वासही रशीद शेख यांनी यावेळी व्यक्त केला. तर रस्ते विकासाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच 30 खाटांचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यापुढे सर्वांना कोरोनासोबत जगावे लागेल परंतू आरोग्य प्रशासनाच्या नियमानुसार सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں