मालेगाव मनपा आयुक्त दिपक कासार यांची झोपडपट्टी पुनर्वसन योजना अभ्यास गटावर निवड


 
महाराष्ट्र राज्यात सध्यास्थितीत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहे. उक्त योजना मालेगाव,औरंगाबाद, नाशिक, अशा राज्यातील इतर उर्वरित प्रमुख शहरांना लागू करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून त्या अभ्यास गटावर मालेगाव मनपाचे आयुक्त दिपक कासार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
अभ्यास गटासाठी ज्येष्ठ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून प्रधानसचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव मनपा आयुक्त दिपक कासार यांची अभ्यास गटाचे सदस्य म्हणून नियुक्त झाली आहे. याचा मालेगाव शहरास नक्कीच मोठा फायदा होणार आहे. मालेगाव शहरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे असून भविष्यात मालेगाव शहरास उक्त योजना लागू झाल्यास त्याअंतर्गत शहरास विशेष निधी, वेगळ्या तरतुदी, प्राथमिक मूलभूत सुविधा गटार रस्ते यांच्या बरोबरच शहरासाठी एफएसआय ही वाढून मिळू शकतो. मालेगाव सारख्या राज्यातील इतर लहान शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय दृष्टिकोन, वित्तीय उपलब्धता, इतर नियंत्रण, विकासकांचे व नागरिकांचे प्रश्न, योजनेच्या सफलतेसाठी परिपूर्ण नियोजन व उद्दिष्टपूर्ती अशा विविध घटकांचा अभ्यास गटाद्वारे विचार होईल. उक्त अभ्यास गटाची सोमवार  दिनांक 2 नोव्हेंबर रोजी प्रथम बैठक मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली आहे. आयुक्त दिपक कासार यांची नियुक्ती मालेगाव तसेच इतर शहरासाठी दिशादर्शक ठरू शकते.
जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

کوئی تبصرے نہیں: