गोर गरीब जनतेची कामे तातडीने मार्गी लावावीत: कृषी मंत्री दादाजी भुसे_मालेगाव येथे महसूल दिन साजरा_

मालेगाव, दि. 03 (उमाका वृत्तसेवा)*: सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करणारा महसूल विभाग असून या विभागाला तंत्रज्ञानाची जोड देवून गोर गरीब जनतेची कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.

महसूल दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय महसूल दिन आणि महाराजस्व अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, न्यायिक व अर्धन्यायिक बाबींवर विहीत कालमर्यादेत काम कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. झोपडीतील माणसाची प्रगती कशी होईल या दृष्टीकोनातून कामकाज करण्यासाठी मोठा वाव असलेला व आशिर्वादपर काम करणारा महसूल विभाग असून अधिकाधिक गोरगरिबांची सेवा करून त्यांना या विभागाकडून न्याय दिला जाईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्याहस्ते अजंदे, भुईगव्हाणच्या तलाठी सुप्रीया जाधव यांची उत्कृष्ठ तलाठी म्हणून त्यांना  मानचिन्ह, शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी सर्व महसूल अधिकारी, कर्मचा-यांना शुभेच्छा देत आगामी वर्षात महसूल विभागाकडून शासनाच्या व जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न करावेत. यासाठी आपण आज संकल्प करुन या संकल्पपूर्तीसाठी मेहनत करुन लोकाभिमुख महसूल प्रशासनाची प्रतिमा निर्माण करू अशी भावना श्री. निकम यांनी यावेळी व्यक्त केली.

उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनीही महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपुर्ण विभागाचा एकत्रितपणे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे 2 हजार 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन याठिकाणी लाभले आहे. महसूल प्रशासनातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी घडविण्याबरोबरच  गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

यावेळी नायब तहसिलदार सोमनाथ खैरे, डी.बी.वाणी, आर.एस.वळवी, शिरस्तेदार श्री.सुर्यवंशी, मधुकर व्यवहारे, बापू जाधव आदि कर्मचारी उपस्थित होते.

*0000*

کوئی تبصرے نہیں: